मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धमकी फोननंतर मुंबई पोलिसांकडून तात्काळ गांभिर्याने दखल घेत फोन करणाऱ्याचा शोध घेतला अंबोली पोलिसांनी एका महिलेला या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव शितल चव्हाण असल्याची माहिती मिळत आहे. हा फोन करणाऱ्या महिलेने नरेंद्र मोदींना मारण्याचा प्लॅन झाल्याचा दावा केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महिलेला अंबोली पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेच्या विचारपूस दरम्यान कोणतीही संशयित माहिती समोर आलेली नाही. अटक करण्यात आलेली महिला ही कौटुंबिक वादामुळे मानसिक तणावाखाली होती अशी प्राथमिक माहिती चौकशीत पोलिसांना मिळाली आहे. तरी देखील या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.