दौंड: श्री तिरुपती बालाजी देवस्थानच्या पवित्र प्रसादाच्या लाडूत प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी दौंड तालुका तहसिलदार यांना महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
जगभरातील कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंध्र प्रदेश राज्यातील श्री तिरुपती बालाजी मंदिर हे साक्षात भगवान श्रीविष्णुचा भूवैकुंठ मानला जातो. अशा परम पवित्र भूवैकुंठातील प्रसादाच्या लाडूमध्ये जनावरांच्या चरबीयुक्त तेलाचा वापर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच स्वतः आंध प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देखील ही माहिती दिली आहे. त्यामुळे देशभरातील भाविक-भक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
श्री तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू हे केवळ अन्न नाही, तर भक्तांच्या श्रद्धेचा, आस्थेचा आणि आध्यात्मिक उर्जेचा एक भाग आहे. अशा पवित्रतम प्रसादामध्ये अशुद्ध आणि धार्मिक दृष्टिकोनातून अनुचित (प्राणांच्या चरबीचा) घटकांचा वापर झाल्याने भक्तांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. पवित्र लाडूमध्ये प्राण्याचे चरबी मिसळणे हा केवळ भेसळीचा साधारण गुन्हा नसून कोट्यवधी हिंदूंच्या धर्मश्रद्धेवर केलेला मोठा धार्मिक आघात आहे.
धार्मिक भावनांचा अनादर आहे. हिंदूशी केलेला विश्वासघात आहे. तसेच जाणीवपूर्वक हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचे षड्यंत्र आहे. श्री तिरुपती बालाजी मंदिर आणि भक्त यांचे पावित्र भंग करणारा अक्षम्य गुन्हा आहे. जे हिंदू समाज कदापि सहन करू शकत नाही. तरी वरील सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघ पुणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली.
यावेळी पारगाव (सा. मा.) येथील गणेश ताकवणे, मधुकर तांबे, विवेक ताकवणे, जिवन बोत्रे, अभिषेक ताकवणे हे हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.