इंदापूर: प्रतिनिधी सचिन आरडे
तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब वालचंदनगर अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी निरवांगी येथील नंदिकेश्र्वर मंदिर परिसराची स्वच्छता आणि वृक्षारोपण केले. तसेच वृक्षांना राखी बांधून वृक्ष आपले मित्र आहेत, असा संदेश देण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य एक दिवसीय श्रमदान शिबिरातून विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक, नैसर्गिक आणि स्वच्छतेची भावना निर्माण व्हावी यासाठी हे एकदिवसीय श्रमदान शिबीराचे आयोजित करण्यात आले होते. हा उपक्रम संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या कल्पनेतून साकारला गेला. या श्रमदान शिबिरामध्ये एकूण 90 विद्यार्थी सहभागी झाले होते.
गावचे सरपंच यांनी मंदिर परिसर प्लास्टिक मुक्त केल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार मानले. सर्व कचरा एका जागी गोळा करण्यात आला आणि मंदिराची स्वच्छता करण्यात आली. एकूण 50 वृक्षांचे ग्रीन क्लबच्या माध्यमातून मंदिर परिसरात रोपण करण्यात आले. या एकदिवसीय श्रमदान शिबीरास महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. विजय केसकर आणि सहकारी प्राध्यापक यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच वृक्षारोपणासाठी निरवांगी ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. विजय केसकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान (NSS) मधील ‘माझी जडणघडण’ या विषयावर किशोर भोसले आणि सोनाली मोरे या दोन विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेंद्रकुमार डांगे आणि प्रा. सुवर्णा बनसोडे व समिती सदस्य प्रा. तेजश्री जाधव, डॉ. अमर वाघमोडे, प्रा. रवी गायकवाड, प्रा. सचिन आरडे, प्रा. नितीन गोरे प्रा. कपिल कांबळे उपस्थित होते.


















