शिरवळ : सांगवी येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणत चर्चेत आलेले शिरवळ पोलीस स्टेशन आता चांगलेच ॲक्शन मोडवर आलेले पाहायला मिळाले.शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंदे करणा-यांना शिरवळ पोलीसांनी दणका दिला आहे. शिरवळ पोलीसांनी कडक धोरण अवलंबत सराईत गुन्हेगारांसह अवैध धंदे करणाऱ्या वीस जणांची आज दि.२१ रोजी शिरवळसह परिसरातून धिंड काढली.
![](https://rajgadnews.live/wp-content/uploads/2023/12/img_20231221_210234096313093949849734224-1024x576.jpeg)
शिरवळ पोलीसांनी व फलटण उपविभागांअंतर्गत असणाऱ्या निर्भया पथकाने छेडछाड करणा-या टोळक्यांविरुध्द तसेच अवैध धंदे करणा-यांच्या मुसक्या आवळण्यास सुरवात केल्याने अवैध धंदे करणा-यांचे धाबे दणाणले आहे.
शिरवळ पोलीसांनी गुरुवार (दि.21 डिसेंबर रोजी) हातभट्टी, दारु विक्री करणारे, मटका व्यवसायिक व सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले व शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संबंधितांची असणारी दहशत मोडीत काढण्याकरीता व नागरिकांमध्ये भितीमुक्त वातावरण निर्मितीकरीता या सर्व जणांना शिरवळ पोलीस स्टेशन परिसर, एसटी बसस्थानक परिसर, मेनरोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शासकीय विश्रामगृह, चावडी चौक, बाजारपेठ, रामेश्वर परिसर अशी धिंड काढली.
![](https://rajgadnews.live/wp-content/uploads/2023/12/img_20231221_21023597924827798641502394-1024x576.jpeg)
सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक आंचल दलाल, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या निर्देशानुसार शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली शिरवळ पोलीसांच्या पथकाने ही कारवाई केली.
शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीत कोणी अवैध्य रित्या व्यवसाय करणाऱ्या बद्दल काही माहीत असल्यास नागरिकांनी ११२ या नंबर वर किंवा शिरवळ पोलीस स्टेशनच्या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा.
नवनाथ मदने पोलीस निरीक्षक शिरवळ