राजगड न्युज नेटवर्क
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील चर्चेत असलेला केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत मंजूर असलेल्या शिरवळच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरु करण्याच्या मागणीकरीता मंगळवार दि.3 आँक्टोंबर रोजी सकाळी 11 वा. खंडाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्या दालनासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राजगड न्युज सोबत बोलताना अंजिक्य उर्फ पप्पू कांबळे व इम्रान उर्फ पप्पू काझी यांनी दिली आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत शिरवळच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा प्रशासकीय आदेश सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या आदेशाने 21 डिसेंबर 2022 ला निघाला आहे. त्याचप्रमाणे तांत्रिक मंजूरी 14 डिसेंबर 2022 ला अधिक्षक अभियंता वैशाली आवटे यांच्या आदेशाने मिळाली आहे. या योजनेचे भूमिपूजन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते 8 फेब्रुवारी 2023 रोजी होऊनही निविदेच्या नियोजित जागी अद्यापपर्यंत एकही वीट रचली गेलेली नाही. स्थानिक प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे सदर योजना रद्द व बारगळ्ण्याच्या स्थितीमध्ये आली असून यामागे सातारा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा डाव असल्याचे आरोप होत आहेत.
दरम्यान,या निषेधार्थ शिरवळमधील ग्रामस्थांच्यावतीने मंगळवार दि.3 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता खंडाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्या दालनासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे.