शिरवळः येथील भागात गुन्हेगारी डोकं वर करू पाहत आहे. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगाराची प्रमाण या भागात वाढताना दिसत असून, शिरवळ पोलिसांचा गुन्हेगारांना धाक राहिला नाही का? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. या भागात देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुसे विक्री करणार असल्याची माहिती थेट सातारा गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सातारा गुन्हे शाखेच्या पथकाने शिरवळ येथील शिंदेवाडी नजीक असलेल्या एका कंपनीच्या मैदानावर देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या एकाला रंगहाथ पकडले. या कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकाने देशी बनावटीचे ४ पिस्टल आणि ४ जिवंत काडतुसे असा २ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अरुण मोहन पाटील पोलीस हवालदार स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी शिरवळ पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ डिसेंबर रोजी गोपनीय बातमीदारामार्फत सातारा गुन्हे शाखेच्या पोलिसांना शुभम उर्फ सोनु अनिल शिंदे व त्याचा साथिदार दिग्विजय उर्फ सनी देसाई (रा. सिंहगड कॅम्पस पुणे) हे शिंदेवाडी ता. खंडाळा जि. सातारा गावच्या हद्दीतील सातारा ते पुणे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गारच्या सर्व्हिस रोडवर प्रणय अॅग्रो कंपनीचे कंपाऊंड जवळ देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार सापळा रचून सातारा गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून ही कारवाई केली.
..अशा प्रकारे सापळा रचून केली अटक
शिंदेवाडी ता. खंडाळा जि. सातारा गावच्या हद्दीतील सातारा ते पुणे जाणारे राष्ट्रीय महामार्ग सर्व्हिस रोडवर प्रणव अॅग्रो कंपनीचे कंपाऊंड जवळ या पथकाने आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचून थांबले होते. दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी दोन व्यक्ती मोफेडवरुन पुणे बाजूकडून प्रणव अॅग्रो कंपनीच्या बाजूकडे येताना पोलिसांना दिसले. त्यांना थांबण्याचा इशारा केला असता मोफेड चालकाने मोफेड थांबविली नाही. मोफेडवर पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला स्टाफच्या मदतीने मोफेडवरुन खाली ओढले मात्र मोफेड चालकाने मोफेड घेवून त्या ठिकाणाहून धूम ठोकली. मोफेडवरुन खाली ओढलेला व्यक्ती पळून जात असताना त्यास पोलिसांनी पकडले. त्याच्याजवळ असलेल्या काळ्या रंगाच्या बॅगची पाहणी पोलिसांनी केली असता त्यामध्ये देशी बनावटीची व त्यास मेंग्झीन असलेली ४ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे मिळून आली. पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस हवालदार लक्ष्मण जगधने, अरुण पाटील, शिवाजी भिसे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन ससाणे व रविराज वर्णकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
फरार आरोपीचा शोध सुरू
पोलिसांनी या व्यक्तीस त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव शुभम उर्फ सोनु अनिल शिंदे (वय २४ वर्षे रा. महर्षीनगर, स्वारगेट पुणे जि. पुणे) असे सांगून त्याच्या सोबत असलेल्या पण पळून गेलेल्या व्यक्तीचे नाव सांगितले. दिग्विजय उर्फ सनी देसाई (रा. सिंहगड कॅम्पस पुणे) असे पळून गेलेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी शुभम उर्फ सोनु अनिल शिंदे याला बेड्या ठोकल्या असून त्याच्या ताब्यातील साहित्य कारवाईत हस्तगत केले आहे. तसेच फरार व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत.