सातारा: सातारा पोलिसांनी कराड तालुक्यातील मसूर येथून अवैधरित्या गावठी पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेत अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि मेसूर पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे. संदेश सतिश ताटे( वय १९ रा. ओगलेवाडी, ता. कराड, जि. सातारा असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. या इसमाविरोधात सातारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास सापळा रचून अटक केली असल्याचे सातारा पोलिसांनी सांगितले.
सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतवडी (ता. कराड) गावच्या हद्दीत मसूर ते शामगाव जाणाऱ्या रस्त्यावर एक जण मोटरसायकलवरून पिस्टल घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना बातमीदारमार्फत मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पथकास सूचना देऊन संबंधित परिसरात कारवाई करण्यास सांगितले होते. दिनांक १६ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील आणि त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पथकाने अंतवडी (ता. कराड) गावच्या हद्दीत मसूर-शामगाव रस्त्यावर मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून ताटे यास ताब्यात घेत अटक केली.
अशी केली अटक
पोलीस पथकाला एक जण मोटरसायकलवरून येताना दिसला. त्याला जागीच पकडून त्यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि एक मोटर सायकल असा एकूण मिळून १ लाख २५ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी कारवाईत हस्तगत केला आहे. तसेच या युवकाविरुद्ध मसूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पारितोष दातीर, सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, लक्ष्मण जगधने, हसन तडवी, सनी आवटे, मुनीर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, राजू कांबळे मनोज जाधव, धीरज महाडिक, अमृत कर्पे, वैभव सावंत, तसेच मसूर पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात, पोलीस अंमलदार महेश लावंड, अमोल पवार, महेश घुटूगडे, विक्रम पोतेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.