भोरः राज्यात युती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आमहत्या देखील वाढल्या आहेत. तरुणांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारी वाढली असून तरुण नैराश्यात आहे. या प्रश्नांवर बोलायला वेळ यांना नाही. सत्ता आल्यानंतर जमिनीवर पाय ठेऊन चालायचे असते. सत्तेच हवा डोक्यात न जाता डोकं शांत ठेवायचे असते. मात्र, तसे होताना दिसत नसून यामुळे या लोकांच्या हातून सत्ता काढावी लागेल, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगता सभेच्या माध्यमातून केले. तसेच भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील विकास कामांना गती द्यायची असेल तर संग्राम थोपटे यांना मतदान करण्याचे आवाहन देखील शरद पवार यांनी यावेळी केले.
एकेकाळी भोर, वेल्हा तालुक्यात रस्ता नावाची गोष्टच नव्हती. अनंतराव थोपटे यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केल्यानंतर अनेक बदल येथे होत गेले. नंतरच्या काळात त्यांच्या नेतृत्वाची कमान घेण्याचे काम त्यांचे पुत्र संग्राम थोपटे यांनी केले. सर्वात जास्त रस्त्यांची कामे ही भोर तालुक्यात झाली असल्याचे यावेळी शरद पवार म्हणाले. यामुळे भविष्यकाळात विकास कामांना गती द्यायची असेल तर संग्राम थोपटे यांना मतदान करण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले. केंद्र आणि राज्यातील युती सरकारच्या कामांबद्दल पवारांना निशाणा साधत टीका देखील केली.
बहिणींचा सन्मान करण्याची धमक यांच्यात नाहीः पवार
राज्यात लाडकी बहिण योजनेसाठी महिलांना १५०० रुपये दिले जातात. तर दुसऱ्या बाजूला महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या २ वर्षांची आकडेवारी पाहता ६७ हजार ३८७ महिलांच्या तक्रारी याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. यामुळे हे शिवछत्रपतींचे राज्य आहे, हे कसे म्हणणार, असा सवाल शरद पवार यांनी केला. यामुळे बहिणींचा सन्मान करण्याची धमक यांच्यात नाही. राज्यात २०,००० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. बरोजगारी वाढलेली आहे. या प्रश्नांवर ही लोकं बोलायला तयार नसल्याची घणाघाती टीका पवार यांनी यावेळी बोलताना केली.