खडकवासलाः येथील परिसरात जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या इस्टेट एजंटवर पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने सपासप करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, हा खून आर्थिक वादातून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेत सतीश सुदाम थोपटे (वय ३८ वर्ष रा. सुशीला पार्क, कोल्हेवाडी, खडकवासला) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी हवेली पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपी व त्याच्या चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दि. २७ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भरदुपारी कोयत्याने केले सपासप वार
सतीश हा या दिवशी त्याच्या घराजवळ असलेल्या सुशिला पार्क येथील रस्त्यावर उभा होता. त्यावेळी अचानक चार ते पाच जणांचे टोळके हातात कोयते घेऊन त्याच्याजवळ आले. त्यांनी काही बोलणं होण्याच्या अगोदरच सतीशवर कोयत्याने एकसारखे सपासप वार केले. हे वार इतके तीक्ष्ण स्वरुपाचे होते की या घटनेत सतीशचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी सतीश रक्ताच्या थारोळ्यात पडला त्या ठिकाणाहून आरोपींनी पळ काढला. सतीशला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू त्याचा मृत्यू झाला.
आर्थिक वादातून हत्या
सतिश भोपटे याच्या नावावर भाऊ किवळे याने फ्लॅट घेण्यासाठी २५ लाख रुपयांचे कर्ज काढले होते. भाऊ कर्जाचे हप्ते भरत नसल्याने त्याच्या नोटिसा सतीश थोपटे याच्या नावावर येत होत्या. त्यामुळे हप्ते भरण्याच्या कारणावरुन त्यांच्यात वारंवार वाद उफाळून येत होते. अखेर या वादाने अखेरची परिसिमा गाठली आणि भाऊ किवळे याने साथिदाराच्या मदतीने सतिशचा काटा काढण्याचे ठरविले. त्यानुसार किवळे याने साथीदारांच्या मदतीने सतीशचा निर्घूपणे खून केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन वांगडे हे करीत आहेत.
गोळीबारप्रकरणी गुन्हा दाखल
सतीश थोपटे याच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी हवेली पोलिसांनी भाऊ किवळे व त्याच्या चार साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.