पुरंदर तालुक्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या सभा होणार असल्याने तालुक्यातील नागरिकांत दोन्ही पवार काय बोलणार याची चर्चा होताना दिसत आहे.
- दोन्ही पवारांच्या सभेने तालुक्यात चर्चेचे वातावरण
- पहिल्यांदाच घडतयं तालुक्यात मोठे राजकीय घमासान
- सभेच्या माध्यमातून एकमेकांना चिमटा काढण्याची शक्यता
- तालुक्यात हाताचा पंजा कमाल करणार की घड्याळाची टीकटीक सुरू होणार
- पुरंदर विधानसभेत तिरंगी लढतीने रंगत वाढणार
जेजुरीः पुरंदर विधानसभा मतदार संघात कधी नव्हे ते राजकीय घमासान होताना पाहवयास मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात सर्वत्र उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षातील बड्या नेत्यांच्या सभा पार पडत आहेत. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीमुळे उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे. पुरंदरमध्ये तिरंगी लढत होणार असून, तिन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. महायुतीचे येथे दोन उमेदवार असून, दोन्ही उमेदवारांनी आपणच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केला आहे. महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ सासवड येथील पालखी तळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली. या सभेच्या माध्यमातून त्यांनी महायुतीचे उमेदवार शिवतारे यांना निवडून देण्याचे आवाहन येथील मतदारांना केले आहे. आता १७ तारखेला आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांच्यासाठी शरद पवार, तर युतीचे उमेदवार संभाजी झेंडे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभा एकाच दिवशी होणार आहेत. यामुळे या दोन्ही सभांकडे साऱ्या तालुक्याचे लक्ष लागले असून, दोन्ही पवार काय बोलणार यासाठी येथील मतदार उत्सुक आहेत.
संजय जगताप यांच्या प्रचारार्थ शरद पवार मैदानात, तर संभाजीराव झेंडे यांच्या प्रचारार्थ अजित पवार मैदानात
तालुक्यात पुरंदर उपसा योजना, गुंजवणी पाणी योजना, जानाई शिरसाई योजना, अत्याधुनिक आरोग्य केंद्र आणि इंजिनिअरिंग महाविद्यालय, जेजुरी येथील नाझरे धरण खोलीकरण आदी प्रश्न प्रचाराच्या केंद्रस्थानी आहेत. दोन्ही उमेदवारांकडून या प्रश्नांवर बोलले जात असून, अहवालाच्या माध्यमातून हे प्रलंबित प्रश्न सोडण्याचे हमी उमेदवारांकडून देण्यात येत आहेत. तालुक्याचे विद्यमान आमदार संजय जगताप यांनी मागच्या म्हणजेच २०१९ च्या निवडणुकीत प्रतिनिधत्व केले आहे. लोकसभा निवडणुकीला खासदार सुप्रिया सुळे यांचे काम जगताप यांनी केले आहे. यामुळे या मतदार संघातून सुळे यांना चांगले मताधिक्क मिळाले होते. नुकतेच संजय जगताप यांनी जेजुरी शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करीत प्रचारार्थ रॅली काढून कोपरा सभा घेतली. तर दुसऱ्या बाजूला युतीचे उमेदवार संभाजीराव झेंडे यांनी देखील मोठ्या प्रमाणावर प्रचार यंत्रणा राबविल्याचे पाहिला मिळाले. झेंडे यांनी प्रशासकीय सेवेत ३३ वर्ष उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम केल्याने त्यांच्याकडे नवा चेहराबरोबरच शासकीय सेवेतील निवृत्ती अधिकारी म्हणून पाहिले जात आहे.