जेजुरीः पुरंदर विधानसभेतून विजय शिवतारे यांनी २१ हजार १८८ मताधिक्क घेत विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच शिवतारे यांनी आघाडी घेतलेली होती. ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत त्यांनी टिकवून धरल या मतदार संघाचे विद्यमान आमदार संजय जगताप यांनी पराभवाची धूळ चारली आहे. शिवतारे विजयी होताच सासवड शहरात त्यांची भव्य विजयी रॅली काढण्यात आली. या रॅलीत शिवसैनिकांसह भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सामील झाले होते.
शहरात ठिकठिकाणी शिवतारे यांच्या कार्यकर्त्यांनी डॅालबीच्या तालावर ठेका धरला होता. मोठ्या प्रमाणावर शिवतारे यांच्या रॅलीत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. रॅली सासवड येथील प्रशासकीय इमारतीपासून सुरू झाली होती. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी शिवतारे यांना खाद्यांवर घेत मोठ्या विजयाची नारेबाजी केली. रॅलीत गुलालाची उधळण करण्यात आली. रॅलीमुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. रॅली आटपून विजय शिवतारे मुंबईत जाणार असल्याची माहिती मिळत असून, त्यांना मंत्री भेट मिळणार असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.