जेजुरीः पुरंदर विधानसभा मतदार संघाकरिता मतमोजणीला उद्या दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून नवीन प्रशासकीय इमारत, सासवड येथे सुरूवात होणार होणार आहे. मतमोजणीकरिता २६ पथके स्थापन करण्यात आली असून, त्यामध्ये १२६ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच आवश्यकता भासल्यास पोलीस बंदोबंस्त देखील तैनात करण्यात आला आहे. मतमोजणीसाठी १४ अधिक (२ राखीव) टेबलचे नियोजन करण्यात आले असून, त्यात प्रत्येकी तीन कर्मचारी असतील व दिवसभरामध्ये 30 फेऱ्यांमध्ये मतमोजणीचे कामकाज पूर्ण होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली.
माध्यम प्रतिनिधींसाठी
मतमोजणी निवडणूक निरीक्षक म्हणून कुमार राजीव रंजन यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचे समन्वय अधिकारी मिलिंद टांकसाळे हे असणार आहेत. नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये विशेष माध्यम कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये जिल्हा माहिती कार्यालय मार्फत प्रवेशपत्र (पास) देण्यात आलेल्या पत्रकार/माध्यम प्रतिनिधी यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या कक्षाचे समन्वय अधिकारी ओंकार शेरकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी हे असून, माध्यमांशी समन्वय साधून त्यांना मतमोजणी संबंधी माहिती पुरवण्याचे काम त्यांच्यामार्फत केले जाणार आहे.
गर्दी न करण्याचे आवाहन
मतमोजणी दरम्यान नागरिकांना मात्र सदर ठिकाणी प्रवेश मिळणार नसून प्रशासकीय इमारतीच्या 100 मीटर कक्षाच्या बाहेरच थांबावे लागणार आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व प्रशासकीय इमारत परिसरामध्ये गर्दी करू नये, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के यांनी नागरिकांना केले आहे. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना सकाळी आठ वाजता त्यांना दिलेले प्रवेशपत्राच्या आधारे मतमोजणी उमेदवार प्रतिनिधी कक्षामध्ये प्रवेश करता येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली.