जेजुरीः पुरंदर विधानसभेची निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची झाली. गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवार पायाला भिंगरी लावून मतदार संघ पिंजून काढत होते. तसेच त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या प्रचाराच्या धावपळीत व्यग्र होते. २३ नोव्हेबर रोजी निकाल असल्याने मिळालेल्या काही दिवसांच्या कालवधीत गेल्या अनेक दिवसांपासून आलेला शीण काढण्यासाठी उमेदवार अन् त्यांचे कार्यकर्ते रिलॅक्स मूडमध्ये आहेत. असे असले तरी निकालाची धाकधूक त्यांना आहे. या सगळ्यात उमेदवारांची सोशल मीडियाची खात्यांनी देखील विश्रांती घेतली असल्याचे पाहिला मिळत आहे. प्रचाराच्या दिवसांत ते अगदी २० नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांच्या सोशल मीडियाच्या खात्यांवर मोठ्या प्रमाणावर अॅक्टिव्हिटी दिसून येत होती. आता ती देखील थंडावली आहेत.
पुरंदर विधानसभेच्या निवडणुकीत जगताप, शिवतारे आणि झेंडे या उमेदवारांनी सोशल मीडियावरून प्रचाराची राळ उडवून दिली होती. त्यांच्या सोशल मीडियाच्या खात्यांवरून पोस्ट, व्हिडिओ आदी गोष्टी दाखविण्यात येत होत्या. त्यासाठी सोशल मीडियाची मोठी यंत्राणा कार्यरत होती, अशी माहिती येथील एका जाणकार व्यक्तीने दिली. मतदार संघात देखील निवडणुकीच्या काळात तयार झालेल्या मोहोलाने देखील विश्रांती घेतली आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतलं की आमचाच उमेदवार आमदार होईल, यामुळे २३ नोव्हेंबरलाच पुरंदरचा आमदार कोण, याचे उत्तर मिळेल.
उमेदवार, कार्यकर्ते अन् सोशल मीडिया
निवडणुकीच्या काळात उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढत प्रचाराचा धुरळा उडवून दिला. कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराला साथ देत गावोगाव वाड्यावस्त्यापर्यंत प्रचारमोहिम राबविली. या दोघांनाही साथ दिली ती सोशल मीडियाने. यामुळे तिन्ही घटकांनी आपली भूमिका उत्तमप्रकारे बजावित निवडणुकीचा सामाना केला.