पुरंदरः राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रशांत जगताप यांनी पुरंदर विधानसभा मतदार संघाशी संबंधितील मतदानादिवशीचे एक कॅाल रेकॅार्डिंग सादर करीत गंभीर आरोप केले आहेत. हे कॅाल रेकॅार्डिंग सर्वत्र मोठी खळबळ उडवत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले आहे. यावेळी मशीन सेट करून हा विजय मिळवण्यात आल्याचा गंभीर आरोप जगताप यांनी यावेळी बोलताना केला आहे.
ही रेकॉर्डिंग पुरंदर विधानसभा मतदारसंघाशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व हडपसर मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ही रेकॉर्डिंग सादर केली. या रेकॉर्डिंगमध्ये ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) स्लो ठेवायचे की फास्ट ठेवायचे, यावर चर्चा होत असल्याचे स्पष्ट होते.
प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत दावा केला आहे की, मतदान यंत्रात १५ ते २५ टक्के मते आधीच सेट करण्यात आली होती. हा विजय भाजपचा नाही, तर ईव्हीएमचा आहे. मशीन सेट करून हा विजय मिळवण्यात आला असल्याचा गंभीर दावा आणि आरोप जगताप यांनी केला आहे.मतदानाच्या दिवशी सकाळी ९ ते ४ या वेळेत मशीन खास पद्धतीने सेट केल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे.
त्यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. यंत्रावर पक्षाचे चिन्ह अपलोड करताना मतदानाची तारीख टाकून सेटिंग करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मॉक पोलच्या वेळेसाठीही ही यंत्रणा तयार करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या दाव्यात किती तथ्य आहे, हे पाहणे महत्वाचे असणार आहे. मात्र त्यांनी केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.