पुणे: ससून रुग्णालयाचा लापरवा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. एका रुग्णाला उंदीर चावून त्याचा मृत्यू झाला धक्कादायक आणि संतापजनक प्रकार झाला असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे. त्यासोबत ससून प्रशासनावर कारवाई करावी अशी मागणी त्या नातेवाईकांनी केली आहे. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असं पवित्रा घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या राजगड तालुक्यात राहणारा सागर रेणुसे (30) हा रस्ते अपघातात जखमी झाला होता. प्रकृती गंभीर असल्याने सागरवर ससून रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. 16 मार्च रोजी सागर याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र 26 मार्च रोजी आयसीयूमध्ये असलेल्या सागरला उंदरांनी चावले. सागरच्या डोक्याला, कानाला आणि इतर अवयवाना उदरांनी घेतला होता. याबाबत डॉक्टरांनीही उंदीर चावल्याचे मान्य केले.
इतकंच नव्हेतर, उंदिर चावल्याने सागरचा मृत्यू झाला आहे. सुरूवातीला उंदीर चावल्याने रुग्ण दगावल्याचा नातेवाईकांचा आरोप रुग्णालयाने फेटाळून लावला. मात्र, नंतर रुग्णालय प्रशासाने उंदीर चावल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याची बाब मान्य केली. या धक्कादायक प्रकारामुळे पुणे जिल्ह्यातील आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. अतिदक्षता विभागात उंदीर शिरण्यापर्यंत आणि ते रुग्णाला चावल्याने त्याचा मृत्यू होईपर्यंत डॉक्टर काय करत होते? असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे.
शिवाय, या घटनेमुळे ससून रुग्णालयातील रुग्णांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याच्या चर्चांना उधाण आले असून सुरक्षेवरून रुग्णालय प्रशासनावर ताशेरे ओडले जात आहेत.
दरम्यान, पुण्यातील ससून सर्वसाधारण रुग्णालय हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांपैकी एक रुग्णालय आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांतील नागरिक उपचारासाठी या रुग्णालयात येत असतात. सध्या 1500 बेड्सची व्यवस्था असलेले प्रशिस्त रुग्णालय महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे चालविले जाते. या रुग्णालयाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील टॉप 10 वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक असणारे बी.जे मेडिकल कॉलेजसुद्धा याच रुग्णालयाचा भाग आहे.