पुणेः जबरदस्तीने गळ्यातील सोन्याची चेन चोरणाऱ्या चार आरोपींचा शोध लावण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले असून, या आरोपींकडून चौकशीत आणखी दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. पुण्यातील लक्ष्मी रोड येथे दि. १२ अॅागस्ट रोजी दोन दुचाकीवरुन चार अनोळखी व्यक्तीने शिल्लक भांडण करुन महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली होती. या चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत होता. गोपनीय माहिती तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे या चोरीतील आरोपींना क्रांती चौक, बुधवार पेठ, पुणे येथून पोलीस उपनिरीक्षक बरुरे व पोलीस अंमलदार गणेश काठे, राहुल मोरे, आशिष खरात, संतोष शेरखाने, सात्ताप्पा पाटील, अर्जुन थोरात यांच्या पथकाने अटक केली आहे. या चोरीच्या गुन्ह्यामध्ये एका अल्पवयीन बालकाचा देखील समावेश आहे.
सदर गुन्ह्याचा तपास करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी तपास पथकाचे अधिकारी मनोज बरुरे व अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशीत केले होते. या गुन्ह्यामधील आरोपींची कासीम आसीफ अन्सारी वय २२ वर्षे, रा. मोमीनपुरा, गंजपेठ, पुणे, अनिकेत अनिल फासगे वय २२ वर्षे, रा. वस्ताद साळवे स्मारकाचे पाठीमागे, गंज पेठ, पुणे, आश्रफ गवुस सय्यद वय २० वर्षे, रा. नवीन म्हाडा, वैदुवाडी, हडपसर, पुणे अल्पवयीन बालक वय १७ वर्षे ११ महिने रा. इंदिरा नगर अप्पर, पुणे अशी आहेत.
त्याच्यांकडे अधिक तपास केला असता त्यांनी वारजे पोलीस स्टेशन हद्दीतील एका दुचाकीस्वारास अडवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून घेतल्याचे कबूल केले असून, या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी व दोन्ही गुन्हयातील सोन्याची चेन जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे हे करीत आहेत.