पुणेः गेल्या तीन दिवसांमध्ये तीन हत्येच्या घटना शहरात घडल्या आहेत. या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून, पोलसांचा धाक उरला नाही का, असा सवाला विचारला जात आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर दिवसाढवळ्या कोयत्याने (koyta gang) एका तरुणावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा हादरवून सोडणार व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यतून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या हल्ल्यात सागर चव्हाण गंभीर जखमी झाला आहे.
मे महिन्यात पुण्यातील डहाणूकर कॉलनी परिसरात एकमेकांकडे बघितल्याच्या कारणावरुन भांडण झाले होते. त्यावेळी एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले होते. तसेच या हल्ल्यात श्रीनिवास वतसलवार या तरुणाचा मृत्यू देखील झाला होता. ज्यावेळी तरुणांनी श्रीनिवासवर हल्ला केला त्यापैकी सागर चव्हाण एक होता.
आज सकाळी पुण्यातील किरकटवाडी भागात सागर चव्हाण याला एका मित्राने बोलवून घेतले असताना त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये सागर चव्हाण हा तरुण गंभीररित्या जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.