पुणेः निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने नाकाबंदी करण्यात येत असून, संशियत वाटणाऱ्या वाहनांची झडती घेतली जात आहे. आज सकाळी सहकार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सातारा रस्त्यावर पोलीस नाकाबंदीसाठी हजर होते. यावेळी एका संशियत वाहनाची पोलिसांनी तपासणी केली असता, तब्बल १३८ कोटींचे सोने पोलिसांना मिळून आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर सोने कोठून कुठे नेले जात होते याचा तपास पोलीस करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तपासणीवेळी हा टेम्पो अडवला. त्यामध्ये पांढऱ्या पोत्यात बॉक्स आढळले, त्यानंतर चालक आणि आणखी एक जण यामध्ये होता. त्यांच्याकडे चौकशी केली. त्याची तपासणी अद्याप चालू आहे. हे जवळपास १३८ कोटी रूपयांचे सोने असल्याची माहिती समोर आली आहे. सहकारनगर परिसरातून ताब्यात घेतलेला हा टेम्पो एका खाजगी लॉजिस्टिक कंपनीचा असून यामधील सोनं पुण्यातील कुठल्या व्यापाऱ्याकडे जात होते. याचा तपास करण्यात येत आहे.
५ कोटीची रक्कम जप्त
गेल्या काही दिवसांपूर्वी खेड शिवापूर टोलक्यावर एका कारमधून पोलिसांनी ५ कोटी रुपये नाकाबंदी दरम्यान हस्तगत केले होते. यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करताना अधिकची खबरदारी घेत सदर कारवाई केली आहे. प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी जप्त केलेले वाहन डिलीव्हिरी ट्रान्सपोर्टचे असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.