वाई: तालुक्यात निधी कोणीही आणला तरी, याचे श्रेय विद्यामान आमदारच घेतात. असे म्हणत पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा प्रवृत्तींना आपण वेळीच रोखले नाही, तर आपण गुलामगिरीत जाऊ असे प्रतिपादन शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी केले. तसेच वाई -खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात गेली 50 वर्षे होऊन अधिक काळ राजकारणात तीच ती घराणी सत्ता भोगत आहेत.
राजकीय कुरघोड्या करणाऱ्या विद्यमान आमदारांची राजकारणातील घराणेशाही संपविण्यासाठीच माझ्यासारखा शेतकरी कुटुंबातील व वारकरी संप्रदायातील व्यक्ती विधानसभेच्या मैदानात उतरला असून, मतदारसंघातील सर्वांचीच मोठी साथ मिळत आहे. आता परिवर्तन निश्चित असल्याचा विश्वास पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केला. श्री मांढरदेवी काळुबाई, लोहारे, बोपर्डी, पिराचीवाडी येथील संवाद यात्रेदरम्यान ते बोलत होते.
आम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणारे कट्टर शिवसैनिक आहोत. संघर्ष आमच्या नसा नसात भिनला आहे, वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात आम्हा शिवसैनिकांना टोकाचा विरोध करणारे विद्यमान आमदार आता मात्र शिवसेना आमच्या सोबतच असल्याचा खोटा कळवळा आणत असल्याची टीका जाधव यांनी केली आहे. तसेच बाळासाहेबांच्या विचाराचा कट्टर शिवसैनिक विद्यमान आमदाराला आता घरी बसवणारच, असा इशारा जाधव यांनी दिला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असल्यामुळे वाई व महाबळेश्वर तालुक्यात हजारो कोटी रुपयांचा विकास निधी त्यांनी दिला आहे. मात्र विद्यमान आमदाराला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या विकास कामाच्या उद्घाटन ,भूमिपूजन करताना मुख्यमंत्री यांचे साधे नाव देखील बोर्डावर टाकले जात नाही यांची खंत आम्हा शिवसैनिकांना आहे.
मांढरदेव पुरुषोत्तम जाधव यांचे आजोळ असल्याने या परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मांढरदेव सरपंच रेश्मा मांढरे, गोरख मांढरे ,तसेच सर्व बाजारपेठेतील व्यापारी लहुजी शक्ती सेनेचे सर्व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले. तसेच रविवार पेठ वाई येथे सर्व देवी भक्त ,वाई तालुका संघटक युवराज अण्णा कोंढाळकर , बाळासाहेब जाधव लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष , शिवसेना वाई विभाग प्रमुख प्रताप भिलारे, भूषण शिंदे,सचिन धायगुडे,भानुदास जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.