नारायणगावः येथे दि. १२ रोजी शेतीमध्ये शेतकाम करणाऱ्या वयोवृध्द महिलेला चाकूचा धाक दाखवून तीन अनोळखी व्यक्तींनी या महिलेच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने चोरी करुन नेले होते. या प्रकरणी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळी जेरबंद केली असून, त्यांच्याकडून आणखी दोन गुन्हे उघडकीस आणले आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कारवाई गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलिसांनी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये दि.१२/०८/२०२४ रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील फिर्यादी भामाबाई बाबाजी येवले (वय ६१ वर्षे रा. पारगावतर्फे आळे ता. जुन्नर जि. पुणे) या कावळ पिंपरी गावच्या हद्दीतमधील शेतीमध्ये दिवसा शेतीकाम करत जनावरे चारत असताना, मोटार सायकलवर आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत फिर्यादी यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने चोरी करुन नेले होते. भरदिवसा रस्त्यालगत जनावरे चारत असणाऱ्या वयोवृद्ध महिलेस लुटण्याचा प्रकार घडल्याने गुन्ह्याचे गांभीर्य वाढले होते.
तब्बल १२० किलोमीटपर्यंतचे फुटेज पोलिसांनी तपासले
त्यामुळे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन करून पोलिसांना सुचना केल्या होत्या. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू करण्यात आला. घटनास्थळाची पाहणी करून आरोपींची मोटार सायकल ज्या दिशेने गेली आहे, त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फुटेजमध्ये उपयुक्त माहिती प्राप्त झाल्याने सुमारे १२० किमी पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज सलग तीन दिवस तपासण्यात आले. संशयित मोटार सायकल शिक्रापूर परिसरात पोहाचली असल्याने परिसरातील बातमीदारांकडून तपास पथकाने माहिती मिळवून गुन्हा करणारे आरोपी नामे सुरज ऊर्फ मोन्या संजय देडगे (वय २४ वर्षे रा. बजरंगवाडी, शिक्रापुर ता. शिरुर जि. पुणे), प्रथमेश उर्फ समर्थ संतोष सासवडे (वय १९ वर्षे रा. बजरंगवाडी शिक्रापुर, ता.शिरुर जि.पुणे), अनिकेत रमेश सरोदे (वय २० वर्षे, ता. शिरुर जि. पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले.
…आणि आणखी एका गुन्ह्याची झाली उकल
त्यांच्याकडे तपास करण्यात आला. त्यावेळी सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने अमोल एकनाथ पेटारे (वय २९ वर्षे रा. बजरंगवाडी ता. शिरुर जि. पुणे) याला दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता, त्यांनी अभिषेक सुभाष पिटेकर रा. बुरुंजवाडी शिक्रापुर ता. शिरुर जि. पुणे याच्या मदतीने उरळगाव ता. शिरूर जि पुणे गावच्या हद्दीतील महिलेचे दागिने लुटल्याचे सांगितले. त्याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. आरोपी अभिषेक सुभाष पिटेकर याला देखील अटक करण्यात आली असून, दोन्ही गुन्ह्यातील चोरी गेलेले सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा एकूण अडीच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, जुन्नर विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, दिपक साबळे, जनार्दन शेळके, संजु जाधव, संदीप वारे, अक्षय नवले, अतुल डेरे, राजू मोमीण, मंगेश थिगळे, सागर धुमाळ, बाळासाहेब खडके, निलेश सुपेकर नारायणगाव पोस्टकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस अंमलदार संतोष कोकणे, सोमनाथ डोके यांनी केली आहे. पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करत आहेत.