दिवेः पुरंदर तालुक्यातील दिवे येथे पोटच्या मुलाने आईवडिलांना शेती नावावर करुन दिली नाही तर जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथे दोन एकर शेती भापकर दाम्पत्याची आहे. ही शेती आई-वडिलांनी नावावर करुन दिली नाही, म्हणून मुलाने दारू पिऊन येऊन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
भापकर दाम्पत्याचा मुलगा संतोष हा शेती करीत असून त्याला दारूचे व्यसन आहे. तो नेहमी आपल्या आई-वडिलांना दोन एकर शेती माझ्या नावावर करा, असे म्हणत दारू पिऊन मारहाण करायचा. तसेच आईवडिलांना वारंवार शिवीगाळ दमदाटी करायचा. मंगळवारी देखील संतोष दारू पिऊन आला. वडिलांना शेतजमीन नावावर करून द्या, नाहीतर मारून टाकीन, अशी धमकी त्याने दिली. त्यावेळी त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या आईला देखील त्याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. सदर भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या नातवंडे, सून यांना देखील मारहाण करण्यात आली.
अशा स्थितीमध्ये संतोष याने त्याच्या आईवडिलांना घरातून बाहेर काढून हाकलून दिले. त्यामुळे भापकर यांनी सासवड पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी सविस्तर तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी तसेच पोलीस हवालदार सुहास लाटणे करीत आहेत.