पुणे/ भोर/ इंदापूर/ आंबेगाव: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर उमेदवारांची अर्ज भरण्याची लगबग सुरू झाली असून, पुण्यातील कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, भोरमधून संग्राम थोपटे, इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील आणि आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील यांनी उमेदवारीचा अर्ज भरण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी आपापल्या मतदार संघामध्ये जाहीर सभा घेत नागरिकांशी संवाद साधला. या सभेला मोठ्या प्रमाणावर संबंधित पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या वतीने येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या ठिकाणाहून रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीमध्ये महिलांचा सहभाग अधिक असल्याचे दिसून येत आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर जेसीबीतून पृष्पवृष्ठ करण्यात येत आहे. तसेच भलेमोठे हार देखील पाटील यांना देण्यात येत आहे.
भोरमधून काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी देखील भोरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत जाहीर सभा घेतली आहे. या सभेला आघाडीतील सर्वच घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत. या सभेत घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून भाषणबाजी करीत थोपटे यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील हे आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांनी देखील भव्य स्वरुपात रॅलीचे आयोजन करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या रॅलीला पाटील यांचे सर्मथक मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. तसेच खा. सुप्रिया सुळे देखील पाटील यांच्या रॅलीत सहभागी झाल्याचे पाहिला मिळत आहे.
आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील यांना पुन्हा एकदा संधी मिळाली असून, त्यांच्या वतीने देखील मंचर शहरात निर्धार मेळाव्याचे आयोजन अर्ज दाखल करण्यापूर्वी करण्यात आले आहे. या मेळाव्यात महिलांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसत आहे.