खंडाळा: येथील राजेंद्र विद्यालयामध्ये एअर जी इंटरनॅशनल इनोव्हेशन लॅबचा शुभारंभ करण्यात आला. शिक्षणासोबत नवीन तंत्रज्ञानाची जोड मिळावी. तसेच नव संकल्पना करण्याची आणि त्यांना प्रत्यक्षात उतरविण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
या इनोव्हेशन लॅबचा शुभारंभ खंडाळा विभाग शिक्षण समितीचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, सुदान येथील एअर जी इंटरनॅशनलचे मुख्य यासीन अदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुरेश पवार, सचिव अनिरुद्ध गाढवे, प्राचार्य शब्बीर नालबंद, एअर जी इंटरनॅशनल इंडियाचे सी.ई.ओ प्रताप पवार, संस्थेचे संचालक, शिक्षक, विद्यार्थी,पालक आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, नवोपक्रम, आणि तांत्रिक कौशल्यांच्या विकासासाठी समर्पित असलेल्या अत्याधुनिक लॅबच्या स्थापनेने शाळेच्या शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.एअर जी इनोवेशन लॅबमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स असे नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे.जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या सैद्धांतिक ज्ञानाचे प्रत्यक्षात रूपांतर करून विविध समस्यांचे समाधान शोधू शकतील.या लॅबमुळे विद्यार्थ्यांना नव्या संधी मिळतील आणि त्यांच्यातील शोधक वृत्ती वाढीस लागेल.
– एअर जी इंटरनॅशनलचे मुख्य यासीन अदम
संस्थेचे सचिव अनिरुद्ध गाढवे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहभागी करून शिक्षणासोबत तंत्रज्ञानाची जोड देऊन उज्वल भविष्य घडवू.या लॅबमध्ये विविध कार्यशाळा, प्रकल्प आणि स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये नवीन उपक्रमांची संस्कृती जोपासेल यात शंका नाही.
एअर जी इंटरनॅशनल इंडियाचे सी.ई. ओ.प्रताप पवार म्हणाले की, खंडाळा सारख्या ग्रामीण भागामध्ये एअर इनोव्हेशन लॅब सुरु होत आहे. संस्थेने दूरदृष्टी ठेवत आधुनिक तंत्रज्ञान असणारी लॅब कार्यान्वीत केली, ही बाब कौतुकास्पद आहे. विद्यालयाच्या या उपक्रमाला साथ मिळावी.
प्राचार्य शब्बीर नालबंद म्हणाले, एअर जी इनोवेशन लॅब ही आमच्या शाळेची भविष्यातील तंत्रज्ञानासोबत विद्यार्थ्यांना तयार करण्याची एक मोठी पायरी आहे. ही लॅब विद्यार्थ्यांना विचारांच्या पारंपारिक चौकटीबाहेर जाऊन नवीन गोष्टी शोधण्याची प्रेरणा देईल. सर्व उपस्थितांचे सुशिला मोहिते यांनी आभार मानले.