इंदापूरः राज्यात आता आचारसंहिता लागू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे ३० अॅाक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटीची तारीख आहे. असे असले तरी आघाडी आणि युती दोन्हींकडून अधिकृतरित्या जागावाटप करण्यात आलेले नाही. यातच इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी २५ अॅाक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे घोषित केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे स्वःताह त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार असल्याचे सांगितले आहे. तालुक्यात निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे पाहिला मिळत आहे.
५ वर्षांमध्ये इंदापूर तालुक्याला ६ हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. यामुळे मला विश्वास आहे की, या निवडणुकीत माझा विजय सोपा नाही, तर अत्यंत सोपा झाला आहे. असा आत्मविश्वास असल्याचे भरणे म्हणाले. तसेच तालुक्यात सहानभूतीच्या लाटेचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपूर्वी मा. मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या हाती तुतारी घेत इंदापूरची निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहे. यामुळे युतीकडून भरणे आणि आघाडीकडून हर्षवर्धन यांनी रिंगणात उतरवले जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. केवळ आता अधिकृतरित्या घोषणा होणे बाकी आहे.