इंदापूरः जिजाऊ फेडरेशनच्या वतीने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, मा. मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये शुक्रवार दि. १६ ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या नोकरी महोत्सवाचे उद्घाटन मा. मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे, युवा नेते राजवर्धन पाटील, महाराष्ट्र राज्य टी. पी. ओ. चे अध्यक्ष डॉ. शितल कुमार रवंदळे उपस्थित होते.
या नोकरी महोत्सवामध्ये रेड्डी फाऊंडेशन, बजाज ऑटो, टाटा मोटर्स, भारत गियर्स, डूथ ऑटोमेटिव्ह, ॲक्सिस बँक, मुटूथ फायनान्स, एलआयसी, रॉयल इन्फोटेक, जिनियस कन्सल्टंट, आर35 सिक्युरिटीज अर्णव इन्फो यासारख्या ७७ कंपन्या व त्यांचे मानव संसाधन विभाग अधिकारी, सीईओ व व्यवस्थापकीय संचालक नोकरी महोत्सवामध्ये सहभागी झाले होते. भिगवन, बावडा , इंदापूर या ठिकाणी घेण्यात आलेल्या कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून १२०० युवक व युवतींनी ऑनलाईन रजिस्टर करून या नोकरीत महोत्सवामध्ये सहभागी झाले होते. डॉ. शितलकुमार रवंदळे यांची महाराष्ट्र राज्य टीपीओच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल मा. मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी केले. यावेळी जी. आर. बी सोल्युशन पुणेचे संचालक गुरुदेव अलुरकर, नानक जाधव तसेच संस्थेचे संचालक सुरेश मेहेर, रघुनाथ राऊत, प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, प्राचार्य डॉ. लहू वावरे, उपप्राचार्य प्रा.दत्तात्रय गोळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. फिरोज शेख यांनी केले. कार्यक्रमाचे आभार इंदापूर महाविद्यालयाचे टीपीओ प्रमुख डॉ. सदाशिव उंबरदंड यांनी मानले.
“इंदापूर तालुक्यातील युवा वर्गाला रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने जिजाऊ फेडरेशनने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. अनेक युवक हुशार, गुणवंतधारक कौशल्यधिष्ठीत असतात. मात्र ,युवकांना रोजगारासंबंधी योग्य असे व्यासपीठ (प्लॅटफॉर्म ) मिळत नाही. जिजाऊ फेडरेशनने गरजू युवा वर्गाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर, एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट वनगळी तसेच श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून दरवर्षी २४ ते २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावेत यासाठी अनेक कंपन्या, उद्योग , व्यवसायिक जगताशी संपर्काच्या माध्यमातून ही संधी त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.”
-हर्षवर्धन पाटील
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करताना तसेच तालुक्यामध्ये संपर्क साधताना बेरोजगाराची समस्या दिसून आली यातून मार्ग काढण्यासाठी रोजगार मिळावे महत्त्वपूर्ण ठरतील या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे.
-अंकिता पाटील- ठाकरे