इंदापूरः राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेतून अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीकास्त्र डागले. यावेळी पवारांनी पाटील यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत तालुक्याच्या विकासकरिता ३०० कोटींचा निधी आणला त्याचे काय केले असा सवाल उपस्थित केला. गोड बोलून सदर निधी घेतला असल्याचा आरोप अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केला. तालुक्यातील विविध विकास कामांचा लेखाजोखा मांडत अजित पवार यांनी पुन्हा एकदा इंदापूरमधून दत्तात्रय भरणे यांना माझ्याबरोबर विधानसभेत पाठवा, असे आवाहन नागरिकांना केले.
गेल्या १० वर्षातील विकासकामे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या २० वर्षांच्या कार्यकाळातील कामे यांच्या तुलना केल्यावर सगळे लक्षात येईल असे देखील ते यावेळी म्हणाले. बारामती सहकारी बँक बघा आणि इंदापूरची सहकारी बँक सलाईनवर असल्याची उपहासात्मक टीका त्यांनी केली. ह्याला आता टांगा आणि घोडा कसा असतो, असे म्हणत ही लोकं उगवत्या सूर्याला नमस्कार करणार आहेत. दलबदल करून कसा लोकं कसा विश्वास ठेवणार असे ते म्हणाले. जिल्हा मी बघतो इंदापूर तालुका बघायचा होता. अनेक संस्था आजघडीला अडचणीत आणल्या असल्याचा आरोप पवारांनी पाटील यांच्यावर केला.