लोणी काळभोर (पुणे) : गाव कामगार तलाठ्यांच्या बदलीचे अधिकार प्रांताधिकारी यांच्याकडून काढून घेत थेट जिल्हाधिकऱ्यांना देण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्याबाबतचे परिपत्रकच आज शासनाने जारी केले आहे. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर (ता. हवेली) येथील गाव कामगार तलाठ्यांच्या बदलीवरुन ‘पुणे प्राईम न्यूज’ने मागील काही दिवसांपासून हा मुद्दा शासन दरबारी लावून धरला होता. मागील काही दिवसात महसूल विभागाबाबत प्रसिध्द झालेल्या बातम्याही मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवल्या होत्या. याबाबतचे परिपत्रक आजच शासनाने जारी केल्याने लोणी काळभोर गाव कामगार तलाठी बदलीत काळेबेरे असल्याचा मुद्दा स्पष्ट झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील तलाठ्यांच्या बदल्यांबरोबरच राज्यभरातून मागील काही दिवसांपासून तलाठ्यांच्या बदल्यांबाबत राज्य सरकारकडे अनेक तक्रारी येत होत्या. तर दुसरीकडे लोणी काळभोरच्या गाव कामगार तलाठ्यांच्या बदलीचा मुद्दा ‘पुणे प्राईम न्यूज’ने शासन दरबारी लावून धरला होता. यातून मार्ग काढण्याबरोबरच, तलाठी बदल्यात नियमितता येण्यासाठी तलाठ्यांची ‘आस्थापना’ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे तलाठ्यांना केवळ एका तालुक्यात काम न करता संपूर्ण जिल्हाभर काम करण्याची संधी मिळणार आहे. तसेच तलाठी संवर्गाचे ‘नियुक्ती प्राधिकारी’ हे जिल्हाधिकारी राहतील.