मुंबईः उद्या दि. ५ डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. त्यांची भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड करण्यात आल्याने तेच राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील, असे दिसत आहे. महायुती सरकारच्या शपथविधी समारंभाची जय्यत तयारी आझाद मैदानावर शेवटच्या टप्प्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच नव्या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असाच फॅार्म्युला ठरला असल्याचे भाजपच्या काही नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ? शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे आहे. मात्र शिवसेनकडून कोणाची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
जवळपास अडीच वर्षांच्या महायुतीच्या कार्यकाळत शिवसेनाचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी काम केले. मात्र, ते नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे शिवसेनेकडून दादा भुसे, उदय सामंत किंवा शंभुराज देसाई यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागू शकते अशी परिस्थिती आहे. यात प्रामुख्याने दादा भुसे यांच्या नावाची जोरदार चर्चा होताना दिसते. मात्र, उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सामंत आणि देसाई असल्याने कोणाला संधी मिळणार हे उद्याच समजेल. मात्र, सध्याच्या घडीला शपथविधीच्या दृष्टाने वेगाने राजकीय घडामोडी आणि बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे.