भोर : मागील काही दिवसांपासून भोर पोलिस स्टेशन हद्दीतील बस स्टँड परिसर, रामबाग,चौपाटी,महाड नाका,नागोबा आळी,नगरपालिका चौक, मंगळवार पेठ,सम्राट चौक,नवी आळी,पिराचा मळा,राजवाडा चौक परिसरात मटका, जुगार, देशी-विदेशी मद्य विक्री, गावठी दारूचे उत्पादन, खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी जिल्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. मात्र, भोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध धंदे जोमात सुरु असून, पोलीस मात्र लुटुपुटुची कारवाई करत आहेत.
भोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील आठ दिवसांत भोर पोलिसांनी हॉटेलच्या परिसरात दारू विक्री करणाऱ्या अंदाजे दोन तीन जणांवर तुटपुंजी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्याकडून काही मुद्देमाल जप्त केला आहे. परंतु अवैध व्यवसाय हे कमी होण्यापेक्षा त्यामध्ये वाढ होत असल्याची नागरिकांची दबक्या आवाजात चर्चा आहे. या बदलाने या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांवर कारवाई होऊन आळा बसेल, अशी अपेक्षा करणाऱ्या नागरिकांची घोर निराशा झाली आहे. वाढत्या अवैध धंद्यामुळे भोर शहरा सह परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत परवाने नसताना यातील जवळपास शहरासह प्रत्येक गावामध्ये अनेक हॉटेल व्यावसायिक मद्यविक्री करत आहेत. अवैध गावठी दारू, ताडी, गांजा यांची विक्री राजरोसपणे सुरू आहे. सामान्य नागरिकांना या अवैध धंद्यांचा त्रास होत आहे. मात्र, संबंधित व्यावसायिक आणि पोलीस यांचे संगनमत असल्याने याबाबत तक्रार कुठे करायची? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच अवैध व्यावसायिकांची दहशत असल्याने नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.
प्रतिबंध करणारी यंत्रणाच ठरतीये कुचकामी?
गावोगावी काही तरुण व्यसनांसह अवैध मटक्याच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. मटक्यातून अनेक वेळा वर्चस्ववादातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. अशा घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. यास प्रतिबंध करणारी यंत्रणाच कुचकामी ठरत असल्याने अशा प्रकारचे गुन्हे वाढत आहेत.
भोर शहरात व हद्दीत अवैध धंदे जोरात?
भोर पोलिस स्टेशन हद्दीत मटक्याचे व जुगाराचे अड्डे सुरु आहेत. भोर मधील बस स्टँड परिसर, रामबाग,चौपाटी,महाड नाका,नागोबा आळी,नगरपालिका चौक, मंगळवार पेठ,सम्राट चौक,नवी आळी,पिराचा मळा,राजवाडा चौक या परिसरात मटक्याचा अड्डा असून, लहान-मोठे हातभट्टी विक्रीची दुकाने आहेत. तसेच ग्रामीण परिसरातही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री, अवैध दारू, मटका, जुगार जोमात सुरु आहेत.
कारवाई करून व्यवसाय पूर्णपणे बंद करावेत
पोलिसांकडून कारवाई झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात हे व्यवसाय बंद होतात. त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने हे व्यवसाय सुरू होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करून येथील व्यवसाय पूर्णपणे बंद करावेत, अशी येथील नागरिकांनी मागणी केली आहे.
विद्यार्थी व्यसनाच्या वाटेवर
शाळा- महाविद्यालयाच्या आवारात देखील गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. हॉस्पिटलच्या आवारात छोट्या पानटपऱ्यांवर गुटखा्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे विद्यार्थी देखील व्यसनाधीन झाले आहेत. यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने पालकांतून संताप व्यक्त होत आहे.