शिरवळ : सहकार महर्षी स्व. जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत कृष्णा परिवाराने शिरवळ येथे कृष्णा विश्व विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसची उभारणी सुरू केली आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा भव्य सोहळा आज आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कुलपती डॉ. सुरेश भोसले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी उत्तरा भोसले यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या कॅम्पसच्या माध्यमातून शिरवळ व परिसराच्या शैक्षणिक आणि औद्योगिक प्रगतीला चालना मिळेल, असे सांगितले. “कृष्णा परिवाराने नेहमीच समाजासाठी झटत राहण्याची परंपरा कायम ठेवली आहे. हा प्रकल्प त्याच परंपरेचा एक भाग आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात गौरवी भोसले, विनायक भोसले, वसुंधरा भोसले, डॉ. जयवर्धन भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कृष्णा विश्व विद्यापीठाचे सल्लागार डॉ. प्रविण शिंगारे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य दिलीप पाटील, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, तसेच शिरवळ व परिसरातील प्रतिष्ठित सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक प्रगतीची नांदी
निरा नदीच्या काठालगत सुमारे ५० एकर क्षेत्रावर उभारल्या जाणाऱ्या या कॅम्पसचे मुख्य आकर्षण म्हणजे ६५० खाटांचे शिक्षण रुग्णालय, २०० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि वैद्यकीय, आयुर्वेदिक, दंतविज्ञान, नर्सिंग, फार्मसी आणि फिजिओथेरपीसारख्या महाविद्यालयांची उभारणी. हा प्रकल्प केवळ शैक्षणिकच नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठीही मोठा टप्पा ठरेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
स्थानिक युवकांना संधी आणि भविष्याचा आश्वासक मार्ग
शिरवळ परिसरातील स्थानिक युवकांना दर्जेदार शिक्षण व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प भविष्यात शिरवळचा विकासप्रकल्प ठरेल, असे सरपंच अनिता मळेकर व रविराज दुधगावकर यांनी सांगितले. या कॅम्पसच्या उभारणीमुळे ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार असून शिरवळ व परिसराला प्रगतीची नवी दिशा मिळणार आहे.
कृष्णा परिवाराने उचललेले हे पाऊल शैक्षणिक क्रांतीची नांदी ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.