नसरापूरः लाडकी बहिण योजनेसाठी आज पुण्यामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला दोनशेहून अधिक बसेस या ठिकाणावरून जाणार होते. याच कारणास्तव पुण्यामध्ये गर्दी होऊ नये यासाठी शासनाकडून अवजड वाहने सातारा-पुणे महामार्गावर किकवी, खेडशिवापूर येथे सकाळी सात वाजल्यापासून थांबविण्यात आली आहेत. या ठिकाणी ही वाहने अडवून ठेवून वाहनधारकांना वेठीस धरण्याचे काम केले जात असल्याचा आरोप वाहनधारकांकडून केला जात आहेत.
यामुळे मोठ्या प्रमाणात या वाहनधारकांचे व मालाचे नुकसान त्यांना सहन करावे लागत आहे. कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता या ठिकाणी ही वाहने अडवण्यात आल्याचे वाहनधारकांवर नाहक मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. या सगळ्या प्रकारावर त्यांनी यावेळी बोलताना रोष व्यक्त केला.
लाडक्या बहिणींचा विचार जसा केला तसा लाडक्या ड्रायव्हरचा देखील करा
येथील सर्विस रोड लगत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, वाहनधारकांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सोई करण्यात आलेली नाही. यामुळे सरकार विरोधात वाहनधारकांनी मोठा आक्रोश व्यक्त केला. तसेच ज्या प्रमाणे लाडक्या बहिणींचा विचार केला त्याप्रमाणे लाडक्या भावांचा व लाडक्या वाहनधारकांचा देखील विचार करणे अपेक्षित असल्याचे भावना यावेळी येथे उभे असलेल्या वाहनधारकांनी व्यक्त केली. तसेच काही तास उलटल्यानंतर देखील या वाहनधारकांना पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची सूचना देण्यात आलेली नाही.