भोर | भोर तालुक्यातील दिवळे ग्रामपंचायतीच्या सरपंच विद्या गोविंद पांगारे यांचे सदस्यत्व व सरपंचपद रद्द करण्यात आले आहे. त्यांनी निर्धारित मुदतीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी पुणे यांनी हा निर्णय दिला आहे. या आदेशानुसार ११ जुलै २०२४ पासून त्यांना ग्रामपंचायत सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे.
दिवळे येथील ग्रामस्थ सोपान बबन बाठे यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यात नमूद करण्यात आले होते की, सन २०२१ मधील ग्रामपंचायत निवडणुकीत विद्या पांगारे यांनी ‘नागरीकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)’ या आरक्षणातून कुणबी जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारी दाखल केली व बिनविरोध निवडून आल्या. मात्र निवडून आल्यानंतर एक वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची कायदेशीर अट असूनही त्यांनी ते सादर केले नाही.
या तक्रारीवर सुनावणी घेऊन, सर्व पक्षांना नोटीस देऊन जिल्हाधिकारी यांनी २३ सप्टेंबर २०२५ रोजी निकाल जाहीर केला. ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १६(२) नुसार तक्रारदाराचा अर्ज मान्य करून विद्या पांगारे यांना सदस्यपदासाठी अपात्र ठरविण्यात आले. परिणामी त्यांचे सरपंचपदही रद्द झाले आहे.
या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना विद्या पांगारे म्हणाल्या, “जिल्हाधिकारी यांच्या आदेशाविरोधात मी अपील करणार असून याबाबत माझे वकिलांशी चर्चाच सुरू आहे.”












