निराः छत्रपती संभाजीनगर येथे उद्या दि. ९ रोजी क्रांतीदिनाचे औचित्य साधत प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आ. बच्चू कडू यांच्या नेवृत्ताखाली दिव्यांगबांधवांसाठीच्या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला राज्याभरातून मोठ्या प्रमाणावर दिव्यांग बांधव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे जिल्ह्यातून प्रहार व इतर समविचारी संघटनेचे १० हजारांहून अधिक कार्यकर्ते संभाजीनगरकडे कूच केली असल्याची माहिती आहे.
पुरंदर तालुक्यातील निरा येथून देखील काही दिव्यांग बांधव संभाजीनगरकडे रवाना झाले आहेत. दिव्यांगासाठी ६ हजार रुपये पेन्शन मिळावी, दिव्यांगांचा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी असावा, दिव्यांगाचा १० लाखांचा विमा मिळावा, दिव्यांग विधवांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन झाले पाहिजे, दिव्यांगासाठी ग्रामपंचायतीने एक गुंठा जमीन दिली पाहिजे या आणि अशा विविध मागण्या घेऊन राज्यातील प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधव येथे दाखल होणार आहेत. या गोष्टींचा सरकारने सकारात्मक होऊन विचार करावा, अशी मागणी निरा येथून संभाजीनगरकडे कूच करणाऱ्या बांधवांनी केली आहे.