बाळु शिंदे: राजगड न्युज
नसरापूर : भोर तालुक्यातील पूर्व भागातील भोंगवली (ता.भोर) येथील धेवडजाई लघुपाटबंधारे तलाव येथे शेतकऱ्यांनी शेतीच्या पाण्यासाठी लावलेल्या मोटरची केबल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली असून दोन महिन्यातील ही दुसरी घटना घडली आहे या घटनेने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
राजगड पोलीस ठाणे हद्दीतील पूर्व भागातील भोंगवली येथील शेतकरी श्रीकांत गुलाब निगडे (वय ३५) यांची चार हजार दोनशे रुपयांची ७० मीटर कॉपरपट्टी केबल, जयसिंग माधवराव निगडे (वय ७०) यांची चार हजार ८०० रुपयांची ८० मीटर केबल, विजय माधवराव निगडे (वय ६५) यांची चार हजार ८०० रुपयांची ८० मीटर केबल, महादेव सीताराम सुर्वे (वय ५८) यांची चार हजार २०० रुपयांची ७० मीटर केबल, गणेश दत्तात्रेय सुर्वे (वय ४२) यांची चार हजार २०० रुपयांची ७० मीटर केबल व सुहास शंकर सुर्वे (वय ५८) यांची चार हजार २०० रुपयांची ७० मीटर केबल, अशी मिळून एकूण २६ हजार ४०० रुपयांची कॉपर केबल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. याबाबातची तक्रार राजगड पोलिस ठाण्यात शेतकऱ्यांनी केली आहे.या होणाऱ्या चोऱ्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.
वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल
भोंगवली भांबवडे नदी किनारी व टाळावा ठिकाणी असणाऱ्या शेती पंपाच्या मागील काही महिन्यात देखील अशाच प्रकारे परिसरातील निरानदी किनारीच्या गावामधील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या केबलची चोरी झाली होती याबाबत सर्व शेतकऱ्यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्याप चोरट्यांचा तपास लागला नसून या चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी आता शेतकरी करत आहेत.