चिंचवडः भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर करण्यात आली आहे. या चिंचवड विधानसभेसाठी भाजपकडून शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आता महायुतीमधील नेते नाराज झाले असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेकजण इच्छुक होते. मात्र, सदर घेतलेला निर्णय मान्य नसल्याचे तसेच हा निर्णय घेताना कोणतीही माहिती मिळाली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेतेमंडळींकडून करण्यात येत आहे. यामुळे आता अनेकजण बंडखोरी करणार असल्याच्या तयारीत आहेत.
यामध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे, मयुर कलाटे आदी आजी माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. सदर निर्णय घेण्याअगोदर आम्हाला शब्द देण्यात आला होता. मात्र हा शब्द पाळला गेला नसल्याचा आरोप ही नेते मंडळी करीत असून, बंडाचे निशाण फडकविणाऱ्यावर ठाम असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच महाआघाडीसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती देत येत्या दोन दिवसांंमध्ये निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.