राजगड न्युज नेटवर्क
खंडाळा : शिरवळ औद्योगिक वसाहतीतील शिंदेवाडी गावच्या हद्दीत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीला माल खरेदी करण्यासाठी पुरवठा करण्याची ऑर्डर देत २४ लाख ३३ हजार ९९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशन मध्ये पंजाबसह दुबई येथील कंपनी मालक व इतर एका विरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरवळ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शिंदेवाडी ता.खंडाळा येथे शेतीविषयक औषधे बनविणारी आंतरराष्ट्रीय कंपनी असून या कंपनीच्या मालकांना व्हॉट्सअँपवर लुधियाना येथील मॉडर्न इंन्सेक्टिसाइड लि. कंपनीच्या सहव्यवस्थापक पूनम यादव यांनी शेतीविषयक औषधांची माहिती मागवली.कंपनी मालकांनी ही माहिती पाठविली. त्यावेळी शिंदेवाडी येथील कंपनीला ई मेलद्वारे एका औषधाची ऑर्डर दुबई येथील संबंधितांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार व दलाली करणा-या अँग्री व्हेन्चर एफझेडसी या कंपनीला पाठविण्यास सांगितले. त्या कंपनीकडून मालाच्या एकूण ४१,३०० अमेरिकी डॉलर पैकी शिंदेवाडी येथील कंपनीला मालापोटी अनामत रक्कम ११,७९० अमेरिकी डॉलर भारतीय चलना नुसार ९ लाख ७२ हजार १०० रुपये जमा करण्यात आले. शिंदेवाडी येथील कंपनीकडून दुबईतील कंपनीला मालाचा पुरवठा करण्यात आला. माल पोहोचल्यानंतर काही दिवसांनी बनावट व्हिडिओ पाठवत संबंधितांनी मालामध्ये तक्रार असल्याचे सांगत कंपनीकडून एकूण भारतीय चलनातील ३४ लाख ५ हजार १८५ रुपयांपैकी शिल्लक रक्कम २४ लाख ३३ हजार ९९ रुपये रक्कम देण्यास टाळाटाळ केली.
यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतं कंपनी मालकांनी शिरवळ पोलीस ठाण्यात धाव घेत झालेला प्रकार सांगत पंजाबसह दुबई येथील कंपनी मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई करीत आहे.