भोर:दि १७ एप्रिल रोजी रात्री ७:३० च्या सुमारास, भोर शहरातील सम्राट चौकात, १८ वर्षीय केशव धर्मेंद्र शिंदे यांच्यावर जुन्या वादाच्या रागातून कोयत्याने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे आणि त्यांचे दोन मित्र भोरमधील रामनवमी यात्रेचा कुस्ती आखाडा पाहण्यासाठी आले होते. तेव्हा, रोहित जाधव नावाच्या इसमाने आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी शिंदे यांच्यावर हल्ला केला. जुन्या वादाचा राग मिटवण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.
या प्रकरणी भादवी कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक संघ तयार केले आहेत आणि लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.