भोर: तालुक्यातील भोंगवली गावात एका व्यक्तीकडून बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडर विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अनधिकृत विक्रेत्याने गॅस सिलेंडर रस्त्यावर ठेवले आहेत आणि त्यांच्याजवळच कचरा जाळला जात आहे, ज्यामुळे गावातील नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील अनेक गावांमध्ये भारत गॅस एजन्सीने अधिकृत वितरक नेमले आहेत. यात भोर-पूर्व हायवेवरील वितरक आणि भोंगवली येथील वितरक यांचा समावेश आहे. मात्र, भोंगवलीमधील वितरकाकडे गॅस वितरणासाठी कोणताही परवाना नसल्याचे उघड झाले आहे.
या अनधिकृत वितरकाने गॅस सिलेंडर रस्त्यावर ठेवून विक्री सुरू केली आहे. यामुळे मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याच गॅस सिलेंडर जवळ कचरा जाळला जात असल्याने आग लागण्याची व स्पोट होण्याची शक्यताही आहे.
विशेष म्हणजे, हा अनधिकृत वितरक जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी आणि ज्युनिअर कॉलेजच्या जवळच गॅस सिलेंडर साठवतो आणि विकतो. यामुळे लहान मुलांच्या जीवावरही धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर बाबीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आज पर्यंत हा गॅस वितरक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नजरेत आला नाही का? की प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जातं आहे? किती दिवसापासून हा व्यक्ती गॅस विक्री करतोय? या व्यक्तीला गॅस सिलेंडर पोहोच कोण करतंय? असे अनेक प्रश्न यातून समोर येत आहेत. या सर्व बाबीतून प्रशासकीय अधिकारी यावर कारवाई करणार का हे पाहणे अपेक्षित आहे
क्रमशः