जेजुरीः पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना दुसऱ्यांदा निवडणूक लढविण्याची संधी मिळालेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जगताप यांच्या वतीने जाहीर सभा पडली. या सभेला मोठ्या प्रमाणावर तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. सभेला संबोधन करण्यासाठी बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. या सभेच्या माध्यमातून आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांनी महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. भाषणाच्या माध्यतून जगताप यांनी सरकार हल्लाबोल केला.
पुरंदर-हवेलीमध्ये अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तालुक्यातील वातावरण हे हाय व्होल्टेजवर असून, सभेच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झडू लागलेल्या आहेत. पुरंदर उपसाबाबत टीका करण्यात आली. मुळात पुरंदर उपसा योजनोकडे दुर्लक्ष करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे २०२५ पर्यंत तालुक्यातील कोणत्याही महिलेवर डोक्यावर हंडा नेण्याची वेळ येणार नसल्याचा शब्द सभेच्या माध्यमातून संजय जगताप यांनी दिला. राज्य सरकारवर हल्लाबोल करीत कामं करण्यासाठी गुजरातवरून कंपनी येते, कॅान्ट्रक्टर देखील गुजरातमधलेच. असे ते यावेळी म्हणाले. सासवड नगरपालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याची दखल वा त्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
माझ्या मागे ‘शरद पवार’
काही लोकं सांगतात दिल्लीवाल्यांनी तिकीट कापलं. सध्या मतांचे विभाजन होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत. पण असे असले तरी माझ्या मागे शरद पवारांच हात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२१ दिवस द्या, पुढचे ५ वर्ष तुमच्यासाठी
२१ दिवस द्या पुढचे पाच वर्ष तुमच्यासाठी काम करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. अनेक विकासकामे प्रलंबित योजना काही नव्या योजना पूर्ण करण्यासाठी पुन्हा विधानसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. उद्या कितीपण येवूद्या त्यांना….असा निर्धार त्यांनी यावेळी केला.