शिक्रापूर: शेरखान शेखः
येथील सात शिक्षकांना विद्यापीठात नोकरी लावतो, असे म्हणून एका भामट्याने तब्बल ३४ लाखांना गंडा घालून फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी या भामट्याविरोधात शिक्रापूर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. फसवणूक झालेल्या सात शिक्षक व्यक्तींची सोमनाथ नामक व्यक्तीशी ओळख झाली. या ओळखीतून सोमनाथाने शिक्षकांशी जवळीक साधत विद्यापीठात ओळख असून, त्याबद्दल्यात ऑनलाईन व रोख स्वरुपात तब्बल ३४ लाख रुपये शिक्षकांकडून उकळले. तसेच अचानक हा भामटा फरार झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे या शिक्षकांना लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत सोमनाथ नामक भामट्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
ओळख वाढवून केली फसवणूक
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथे राहणारे काही शिक्षक व वेगवेगळ्या शाळेमध्ये शिपाई या पदावर नोकरीस असलेल्या व्यक्तींची सोमनाथ नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. या ओळखीतून सोमनाथने सात शिक्षक व्यक्तींना माझी पुणे विद्यापीठात ओळख असून, मी अनेकांना नोकरीला लावले आहे, तुम्हाला देखील नोकरीला लावतो, असे म्हणून सात जणांकडून ऑनलाईन व रोख स्वरूपात तब्बल ३४ लाख रुपये घेत काही कागदपत्रे देखील या शिक्षकांकडून घेतले. त्यांनतर वेळोवेळी वेगवेगळ्या तारीख देऊन या व्यक्तीने अनेक दिवस घालवत नंतर अचानकपणे हा भामटा फरार झाला. दरम्यान, शिक्षकांनी त्याच्याशी संपर्क केला असता संपर्क देखील होऊ शकत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत शिक्षकांनी शिक्रापूर पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे, तर याबाबत बोलताना सदर प्रकरणाबाबत सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी सांगितले.