अहमदनगरः नेवासा तालुक्यातील पाचेगावमधील शेतात शुक्रवारी (दि. १६) रोजी शेतकरी शेतात गवत कापण्याकरीता आला असता तेथे त्यांना एक मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी स्थानिक पोलीस पाटलांना दिली. त्यानंतर पोलीस पाटलांनी या घटनेची माहिती पोलिसांनी कळवली. नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असता सदर मयत व्यक्ती ३० ते ३५ वर्षांची पुरुष असून, या व्यक्तीवर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन खून केल्याची स्पष्ट झाले. या घटनेमुळे येथील परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत पुनतगावचे पोलीस पाटील संजय वाकचौरे यांनी फिर्याद दिली असून, या प्रकरणी पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. . नेवासा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान गतीने फिरवली आहेत. घटनेच्या ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी भेट दिली आहे. पंचनामा, उत्तरीय तपासणी करण्यात आलेली आहे. सदर खूनाबाबत पोलिसांना धागेदोरे मिळाले असून खून्यापर्यंत लवकरच पोलीस पोहचतील, असा विश्वास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी व्यक्त केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय जाधव करीत आहेत.