खेड शिवापूर: राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांनी आज रविवारी (दि. २७ ऑक्टोबर) पहाटे ५ च्या दरम्यान मोठी कारवाई केली आहे. यामध्ये अवैध्य गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकसह २ जण ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल १ कोटी १५ लाख ८८ हजार २४० रुपयांच्या अवैध गुटख्याची (विमल पानमसाला) २०२ पोती आणि आयशर ट्रक ताब्यात घेतला आहे.
मल्लमा भिमाया दौडमनी वय 31, सध्या रा कात्रज अजलीनगर ता हवेली जि पुणे मुळ गाव जिल्हा गदग तालुका नरगुंड गाव मदगुनकी कर्नाटक, तुशार दिपक घोरपडे वय 26 वर्षों, रा. जाभुळ्याडी रोड पनि नगर बनि मंदीर मागे ता. हवेली जि. पुणे, स्वप्रील भालषंकर, बबलु पाटील पुर्ण नाव माहीत नाही अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना गोपनीय बातमीदारांमर्फत माहिती मिळाली की, एक ट्रक साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जाणार असून तो पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान खेड शिवापूर टोल नाक्याजवळ येणार आहे. अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी वेगाने सूत्र फिरवत पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलीस हवालदार सोमनाथ जाधव, अक्षय नलावडे, सचिन नकटे यांच्यासह खेड शिवापूर टोल नाक्यावर नाकाबंदी केली.
यादरम्यान त्यांनी एम. एच. ०५ डी. के. ८१६७ क्रमांक असलेला ट्रक ताब्यात घेतला असून, राजगड पोलीसांकडून पुढील कारवाई सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 व त्याअंतर्गत नियम व नियमाचे 2011 च्या विविध कलमानुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.