भोर: येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयातील मैदानावर रविवार २९ सप्टेंबर रोजी अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने तालुकास्तरीय गौरी-गणपती सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. राज्यात भ्रष्टाचार आणि महागाईचा भस्मासुर वाढवणाऱ्या सरकारला धडा शिकवण्याची आता वेळ आली आहे, असे म्हणत भोर विधानसभा मतदार संघातील नारी शक्तीने एकत्रित येऊन आमदार संग्राम थोपटे या भावाच्या हाताला साथ द्या, असे प्रतिपादन सुळे यांनी यावेळी बोलताना केले.
या कार्यक्रमात गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमासाठी महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. अंदाजे या कार्यक्रमासाठी १० हजारांहून अधिक महिला उपस्थित होत्या. यावेळी महाराष्ट्र महिला आघाडी काँग्रेस अध्यक्ष संध्या सव्वालाखे, आमदार संग्राम थोपटे, राजगड ज्ञानपीठाच्या सचिवा स्वरूपा थोपटे, विश्वस्त पृथ्वीराज थोपटे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष रवींद्र बांदल,माजी सभापती बाळासाहेब थोपटे, तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, माजी जि. प. सदस्य विठ्ठल आवाळे, युवा उद्योजक अनीलनाना सावले, बाजार समिती सभापती आनंदा आंबवले, खरेदी विक्री संघ चेअरमन अतुल किंद्रे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
……म्हणून तीन टर्म आमदारः खा. सुप्रिया सुळे
भोर-वेल्हा-मुळशी तालुक्यातील तळागळातील घटकाबरोबर राहून विकास साधण्याचे काम आमदार संग्राम थोपटे यांनी केले आहे. विकासाला महत्व दिल्यामुले आमदार संग्राम थोपटे हे येथून तीन वेळा आमदार झाले आहेत. एका अर्थाने इथल्या मतदारांची मने त्यांनी जिंकलेली आहेत. यामुळे विकास साधणाऱ्या निष्ठावंत भावाच्या हाताला साथ देण्याचे आवाहन सुळे यांनी केले आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करणारः आमदार संग्राम थोपटे
अनंत निर्मल ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यातील महिलांना रोजगारक्षम बनविले जात आहे. त्यांच्या हाताला राजगार मिळण्यासाठी ट्रस्टच्या वतीने अनेक कामे केली जात आहेत. भविष्य काळात देखील हे काम असे सुरू राहणार असून, महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे थोपटे यांनी सांगितले.