नसरापूर: पुणे-सातारा महामार्गावरील (pune-satara highway) राजगड पोलीस स्टेशनच्या जवळच असलेल्या मधुशाला बिअर अॅन्ड वाईन शॅाप नावाच्या मध्यविक्रीच्या दुकानाचे शटर लोखंडी रॅाडच्या साह्याने तोडून ४ लाख रुपयांची रोख रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. मात्र दुकानातील मध्याच्या बाटल्या आहेत तशाच आहेत. याशिवाय चोरट्यांनी शॅापमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या स्टोरजची हार्ड डिस्क चोरून नेली आहे. सदर घटना शुक्रवारी रात्रीच्या वेळी घडली असून, याबाबत राजगड पोलिसांना माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सदर बारचे दुकान ११ वाजण्याच्या सुमारास बंद करण्यात आले होते. सकाळी नेहमीप्रमाणे कामगार दुकानच्या येथे आल्यानंतर सदर ठिकाणी शटरचे लॅाक उचकटलेले त्याला दिसले. कामगाराने मालकाला दुकानात चोरी झाली असल्याचे कळवले. त्यानंतर मालकाने राजगड पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दिली आहे. यावरुन पोलिसांकडून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलीस तपास करीत आहेत.