तरुणांना पडलाय पारंपरिक खेळाचा विसर ,डिजे संस्कृती समाजासह पर्यावरणास घातकच
भोर -सध्या दहिहंडी , गणेशोत्सव पार पडला यामध्ये अनेक भागात, अनेक ठिकाणी डिजे चा अतिरेकी वापर झाला. डी जे डॉल्बीच्या तालावर बेभानपणे तरुणाई थिरकली.या डीजे डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे होणारा त्रास, धडकी भरेल असा दणदणाट,लेझर लाईटने दिपणारे डोळे , अशामुळे राहिलेले दिवस तरी सुखात जाऊ द्या,याच तरूणाईला सध्या समाजाचा विसर पडला असुन या तरुणाईला पाहून जुन्या बुजुर्ग पिढीने आमच्या टायमाला असं काही नव्हतं असा संदेश देत आपली खंत व्यक्त केली आहे.
सध्या धावपळीच्या मोबाईलच्या विज्ञान युगात जुन्या चालीरीती, संस्कृती ,रुढी, परंपरा जपणारी जेष्ठ पिढी हळुहळु लोप पावत चालली आहे. ग्रामीण भागात गावच्या कट्ट्यावर,पारावर , शहरात चौकात,सलुनच्या दुकानात टोपी, पांढरा सदरा ,पायजमा,धोतर घातलेली बुजुर्ग मंडळी सध्या तरुण पिढीच्या कारणाम्यांमुळे होणा-या त्रासाला कंटाळून मोबाईल मध्ये डोकं घातलेल्या,डिजेच्या तालावर थिरकणा-या , तोंडात मावा , गुटखा खाऊन तोंड लाल कर णा-या तरूण पिढीकडे पहात “आमच्या टायमाला असं काही नव्हतं ” असं म्हणत आता जरा तरी नीट वागा, आम्हांलाही शांत जगु द्या असा संदेश आजच्या तरूणाईला देत असल्याचे चित्र सध्या गावा गावात पहायला मिळत आहे.
मागील तीस पस्तीस वर्षा पुर्वी ज्या वेळेस ही पिढी तरुण होती वेळेस एक वेगळीच समाजपधद्ती होती,एक वेगळे संस्कारी वळण या पिढीला होते. सकाळी लवकर उठणारे, रात्री वेळेवर झोपणारे, वेळेवर पण मोजकेच पौष्टिक आहार घेणारे,पाणी वाया न घालवता झाडाला पाणी देणारे, फुलं तोडून रोज देवपूजा करणारे, मंदिरात जाऊन देव देवतांच्या पूजा करणारे, रस्त्यातून भेटणाऱ्यांची आस्थेने चौकशी करणारे, अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे घरी येणा-या पाहुण्यांचा पाहुणचार करणारे, दोन्ही हात छातीशी घेऊन नमस्कार घालणारे, अन्नधान्य वाया जाऊ न देणारे बेतानेच स्वयंपाक करणारे ,उरलं सुरल गरिबाला ,भुकलेल्याला देणारे , येणाऱ्या सणां दिवशी एकत्रित सुखदुःख कार्यात सहभागी होणारे,दांगड धिंगाणा न घालता साधेपणाने चालीरीती जपुन सण साजरे करणारे ,व्यसन करण्यासाठी लाजणारे ,मोठ्यांचा आदर बाळगणारे , जुना झालेला चष्मा तुटला तरी दोरीत वापरणारे , जुनी झालेली चप्पल फाटली तरी शिवणारे, जुनी कपडे असली तरी नीट नेटकी वापरणारे, घरगुती पद्धतीने अन्न पदार्थ घरीच बनवणारे खिशातला पैसा जपून वापरणारे शक्यतो घरीच जेवणारे, एकत्रित कितीही मोठे कुटुंब असले तरी त्यांचा सांभाळ करणारे, गावातील भांडण तंटा गावातच मिटवणारे, राजकारण्यांपासून अलिप्त राहणारे असे समाजाविषयी आदर बाळगणारे, गावातील ढोल लेझीम खेळ एकत्रपे गावोगावी जाऊन खेळणारे,समाधानी लोक आता हळूहळू हे कमी होत चालले आहेत एकूणच येत्या दहा पंधरा वर्षांमध्ये ही पिढी जग सोडून जाणार असल्याचे कटू सत्य असलं तरी मात्र त्यांची एक शिकवण मात्र त्यांच्याबरोबर जाणार आहे. समाजात, साधे ,अर्थपूर्ण दुसऱ्यांना प्रेरणा देऊन ,समोरच्याची काळजी घेणारे, जीवन कसं जगायचं हे सांगणारे, नेतृत्व, कर्तृत्व, स्वाभिमान बाळगणारे आता हळूहळू संपणार आहेत त्यामुळे आत्ताच्या पिढीने या पिढीचे संस्कृती चालीरीती रुढी परंपरा जपणारे गुण अंगीकारणे गरजेचे आहे असे या पिढीकडून सांगण्यात आले आहे.
जेष्ठ बुजुर्ग नागरिक आता वर्तमानपत्र, टीव्ही, मोबाईल पाहताना आजच्या तरुणाईचे कारणामे, तरुण पिढी कोणत्या थराला चालल्याचे दृश्ये ,वाढती गुन्हेगारी, व्यसनाधीनता,वाढता मोबाईलचा प्रभाव, समाजाचे होणारे तरुण पिढीकडून नूकसान, धार्मिक सणांना दोन समाजात चालणारी चढाओढ, जातीभेद, महिलांची असुरक्षितता, बाल लैंगिक अत्याचार,शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष,डीजे वाढता अतिरेकी वापर, पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल हे सभोवताली बघताना तरूणाईला चांगलं रहाण्याचा संदेश देत आमच्या टायमाला असं नव्हतं हे आपसात बोलत आहेत.