इंदापूरः प्रतिनिधी सचिन आरडे
इंदापूर: ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब-वालचंदनगर आणि महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने दि १ ऑगस्ट ते ४ ऑगस्ट या दरम्यान चार दिवसीय नाटक आणि सादरीकरण कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विजय केसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि वैयक्तिक विकास यावर विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बनसोडे मॅडम यांनी केले, तर प्रास्तविक सांस्कृतिक विभाग प्रमुख विद्या गुळीग यांनी केले. आभार प्रा. सचिन आरडे यांनी मानले.
उद्घाटनानंतर पहिल्या सत्रामध्ये विद्या प्रतिष्ठानचे न्यू बाल विकास मंदिर या शाळेतील मराठी विभागाचे प्रा. नरेंद्र बळे यांनी विद्यार्थ्यांना नाटकामध्ये स्पष्ट उच्चार कसा करावा व का महत्वाचा आहे, तसेच श्वास नियंत्रण, भाषाशैली या विषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी विकास शहा यांनी विद्यार्थ्यांना पूर्वीची रंगभूमी आणि अलीकडे होत असलेले बदल, तसेच रंगभूमी विषयीचा आपला प्रदीर्घ अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला. तसेच यावेळी त्यांनी नाटकात आवश्यक बदल देखील सुचविले. कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी शिवनगर विद्या प्रसारक मंडळ इंजिनिअरिंग कॉलेज माळेगाव येथील प्रा. राजकुमार मुळे यांनी विद्यार्थ्यांना दिग्दर्शन कसे करावे, प्रकाश योजना कशा प्रकारची असावी, त्याची तंत्रे कशी विकसित करावीत, या संदर्भाने मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी विवेक ढमाळ यांनी स्क्रिप्ट समजून घेण्याचे कौशल्य,आत्मसात करण्याची पद्धत आणि सुधारणा या विषयी मार्गदर्शन केले. ४ ऑगस्ट रोजी कार्यशाळेचा समारोप कार्यक्रम घेण्यात आला. कार्यशाळा सुरू असताना संस्थेचे सचिव विरसिंह (भैय्या) रणसिंग यांनी सदिच्छा भेट दिली. कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विजय केसकर यांचे मार्गदर्शन लाभले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विद्या गुळीग व सांस्कृतिक विभाग सदस्य यांनी श्रम घेतले.