भोर: कर्नावड (ता. भोर) येथील ४० वर्षीय तुषार शिनगारे याचा सोमवारी रात्री (२२ जुलै) अंबवडे (ता. भोर) येथे संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
तुषार हा इतर दोन मित्रांसोबत अंबवडे येथे मद्यपान करत होता. रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच भोरचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी पोलिस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, पोलिस हवालदार यशवंत शिंदे आणि अभय बर्गे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली.
तुषारच्या मृतदेहावर कोणतीही दिसणारी जखम नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसून, हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी मद्यपान करणाऱ्या इतर दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.
तुषारच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे आणि डॉक्टरांच्या अहवालानुसार पुढील तपास आणि कारवाई करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी सांगितले.
पोलिसांनी तपास तीव्र केला असून लवकरच खुलासा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.