४ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त! शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील सहा गुन्हे उघडकीस आणण्यातही यश प्राप्त
शिरवळ: शिरवळ पोलीसांनी तांब्याच्या तारा चोरी करणारी परप्रांतीय टोळी गजाआड केली असून या टोळीकडून कारसह सुमारे ४ लाख ५१ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील सहा गुन्हे उघडकीस आणण्यातही यश प्राप्त झाले आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सातारा महामार्गावरील शिरवळ, नायगाव, धनगरवाडी, केसुर्डी, भोळी यासह शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या मालकीच्या विद्युत जनित्र (डी.पी.) तून तांब्याच्या तारे चोरीच्या घटना गेल्या ५-६ महिन्यांपासून वाढत होत्या. याप्रकरणी शिरवळ पोलिस स्टेशन मध्ये अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या घटनेची दखल घेत सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. या तपासात टोळी पिंपरी चिंचवड, पुणे येथील परप्रांतीय आणि भोर तालुक्यातील चोरट्यांची असल्याचे निष्पन्न झाले.
शिरवळ पोलीसांनी टोळीचा प्रमुख अशपाक खान याला शिरवळ हद्दीत सापळा रचून पकडले. त्याच्याकडून चौकशी केल्यावर त्याने इतर तीन साथीदारांसह गुन्हे केल्याची कबुली दिली. यामुळे शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील ६ गुन्हे उघडकीस आले.या टोळीकडून कारसह ४ लाख ५१ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील सहा गुन्हे उघडकीस आणण्यातही यश आले आहे.
सदर कारवाई सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल व उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, पोलीस उप-निरीक्षक सतिश आंदेलवार पोलीस अंमलदार धरमसिंग पावरा, संपत कांबळे, प्रशांत धुमाळ, विजय शिंदे, अजित बोराटे, सुरज चव्हाण, मंगेश मोझर यांच्या पथकाने केली आहे