नसरापूर: पुणे-सातारा महामार्गावर रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना थांबवून मारहाण करत लूटमार करणाऱ्या तिघांना राजगड पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद अनिस शेख (वय २७, रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शुक्रवार (ता. ५) रात्री एक वाजण्याच्या सुमारास शेख हे त्यांची दुचाकीवरून (क्र. एम.एच ११ बी.जी. ४३३६) सातारा बाजूकडे जात होते. महामार्गावर कामथडी (ता. भोर) येथे मागून स्प्लेंडर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना थांबवले. “तुमची पाठीमागे बांधलेली बॅग पडायला आली आहे,” असे सांगून त्यांनी शेख यांना थांबवले. थांबल्यावर त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील २१ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि रोख बाराशे रुपये घेऊन गेले.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिस ठाण्यातील रात्रगस्ती पोलिसांनी तातडीने पाठलाग करत सुनील रघुनाथ मादस्वार (वय २१, रा. कोथरूड, पुणे), ऋषिकेश चंद्रकांत चंदनवाले (वय २०, रा. फुरसुंगी, पुणे) आणि लकी देविदास बर्गे (वय २३, रा. सातववाडी, हडपसर) यांना अटक केली.
तीन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. राजगड पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.