भोर : बारामती लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत असलेल्या महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार व महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांचा भोर तालुक्यात प्रचारा निमित्त दौरे सुरू आहेत.भोर तालुक्यातील खेडोपाड्यात जाऊन प्रत्येक पदाधिकारी आपापल्या उमेदवाराचा प्रचार करत आहे परंतु भोर तालुक्यातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारादरम्यान सुप्रिया सुळे यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील पूर्व पट्ट्यामध्ये असलेल्या कांबरे खे.बा, नायगाव,देगाव,करंदी खे.बा, उंबरे,खडकी, कामथडी,हरिश्चंद्र,कापूरहोळ ,दिवळे या गावात सोमवारी महायुतीच्या पदाधिकाऱ्याकडून प्रचार दौरा सुरू होता या प्रचार दौऱ्यानिमित्त मतदारांना महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याची व घड्याळासमोरील बटन दाबण्याचे आवाहन केले जात आहे हेच करत असताना भोर तालुक्यातील गावामध्ये सोमवारी प्रचार दौरा आयोजित केला होता याच पदाधिकाऱ्यांकडूनच दिवळे गावात नकळत सुप्रिया सुळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन भर सभेत करण्यात आले. ही चूक लक्षात आल्यानंतर नेतेमंडळींकडून सारवा सारव करण्यात आली. यावरून नेतेमंडळी सोडली तर स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना देखील माहित नाही का? असा सवाल नागरिक आता करीत आहेत.
भोर तालुक्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद?
तालुक्यातील आजपर्यंत विरोधक राहिलेले राष्ट्रवादी,भाजप,शिवसेना व इतर काही पक्ष यांनी एकत्रित आपल्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना विजयी करण्यासाठी नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे सांगड बांधले परंतु ही सांगड मात्र दिखव्या पूर्तीच असून यांच्यामध्ये अंतर्गत धुसपुस नेहमीच सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. राष्ट्रवादीचे नेते विरोधकांवर कोणत्या प्रकारची टीका करत नाहीत परंतु महायुतीचे इतर पक्षातील नेते हे विरोधकांवर नेहमीच बोलत असतात यातूनच नक्की महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे देखील समजू शकले नाही? महायुतीचे आघाडीचे काही नेते टीका करणाऱ्या नेत्यांवर बोलण्यास मनाई करत आहेत. यातूनच अनेक धुसफूस सुरू असल्याचं नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
बातमी करणाऱ्या पत्रकारांना क्रॉस जाण्याचा दम…
एखाद्या वार्ताहरने वार्तांकन केले तर महायुतीच्या काही नेतेमंडळी कडून दम देण्याचा देखील प्रकार केला जात आहे. पत्रकाराने आपले काम करत असताना गोष्टी लिहिल्या असता पत्रकारांना दम देऊन त्यांच्या बातम्यांवरून माघार घेण्यास आणि महायुतीविरोधात नकारात्मक बातम्या न छापण्यास सांगितले जात आहे.